रितं
Posted by उदयराज बाळ on April 3, 2006
दुनियेचं रंगलेलं गाणं एेकतांना
थोडं गुणगुणायचं होतं
म्हणायचं ते ओठातच विरलं
राहुनच गेलं …
ओंजळ भरुन दोन्ही हातांची
भरभरुन घेतलं
चिमुटभर दयायचं
राहुनचं गेलं …
सहस्त्रधारांनी भिजतांना
गात्र-गात्र चिंब होतांना
नकळत पाझरायचं होतं
थेंब बनून ओघळायचं
राहुनचं गेलं …
बहरायचं होतं, फुलायचं होतं
फुलांचे सडे शिंपायचं होतं
वेचणा-या हातांसाठी झुरायचं
राहुनचं गेलं …
असं साचुन राहायचं नव्हतं
खळाळत वहायचं होतं
कडे-कपारीतुन उसळायचं
राहुनचं गेलं …
असं धुमसत राहायचं नव्हतं
ज्वालामुखी, वणवाही
व्हायचं नव्हतं
दिव्यासारखं तेवायचं
राहुनचं गेलं …
रितं रितं आभाळ माझं
बरसायचं विसरुन गेलं
स्वतःचं आभाळपणच
हरवून बसलं …
Dinesh Wadekar said
Sahi aahe…kay mast kavita aahe….waiting for next poems
शैलेश श. खांडेकर said
सुंदर कविता! अशा अजून येऊ द्यात की!