मला नेहमीच एकटं शांतपणे भटकायला आवडतं. फारतर एखादा-दुसरा सोबती असलेला चालतो. दुर कुठंतरी रानात गावाबाहेर जावं तिथल्या गुढ वातावरणात रमुन, रानवाऱ्याचा आवाज ऐकावा. आपला एकांत आपल्याशीच बोलका व्हावा. कदाचित माझा लहानपणीचा मित्र जरा अबोल होता म्हणून असेल, पण घरी-दारी प्रचंड बडबड करणारा, कोट्या करणारा मी – असा बाहेर माळरानावर पाय ठेवला कि अबोल, अंर्तमुख होतो.
काहींना अश्या ठिकाणी जाउन देखील मोठ्याने गाणी वाजवून डान्स करायची इच्छा होते. अश्यावेळी इतक्या लांबवर येण वाया गेलं असं वाटतं. मी द्विधा. कधी न पाहिलेली रानफुलं, पक्षी, डोंगर आणी पाणी पाहून जिवाला निववायचं की लोक काय म्हणतील याचा विचार करुन त्यांच्यात सामील व्हायचं?
मी कसाबसा त्यांच्या मागे चालू लागतो आणी नेहमीप्रमाणे काहीतरी बोलत राहतो. हळूच कोणीतरी मागून बोलतं “बघ मी सांगीतलं नव्हतं, लक्ष दिलं नाही कि येईल आपोआप”. माझं लक्ष मागे डोंगरांवर पडलेल्या दोन दगडांकडे लागलेलं असतं. ते जवळ जवळ मांडून ठेवलेल्या खुर्च्यांसारखे दिसत असतात. जणू माझी आणी माझ्या मित्राची वाट पाहतायत, वर्षानुवर्ष …
मी मोबाईल काढतो एक फोटो क्लिक करतो आणी परतीच्या प्रवासाला लागतो. नेहमीच्या माझ्या आयुष्यात एका आणखी चुटपुटीची भर घालुन.
